नागपुरच्या शाळेत करोनाचा विस्फोट; तब्बल ३८ विद्यार्थ्यांना एकाचवेळी लागण

चाचण्यांच्या कमी संख्येनंतरही जिल्ह्यातील दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पुढे आले आहे. रविवारी २६२ दैनंदिन बाधितांची नोंद झाली. यात ३८ बाधित हे एका शाळेचे विद्यार्थी आहेत.

नागपूर: चाचण्यांच्या कमी संख्येनंतरही जिल्ह्यातील दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पुढे आले आहे. रविवारी २६२ दैनंदिन बाधितांची नोंद झाली. यात ३८ बाधित हे एका शाळेचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, जिल्ह्यात शनिवारी १ हजार ९६४ चाचण्या करण्यात आल्या. शहरात सर्वाधिक १६२ तर ग्रामीणमध्ये १०० बाधितांची नोंद झाली.

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा दर १३ टक्क्यांहून अधिक आहे. बाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. दिवसभरात ११८ रुग्ण बरे झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार २२१ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या २८ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

महापालिकेच्यावतीने शहरातील विविध भागांत तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत सदरच्या शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. यात ३८ विद्यार्थी पॉझटिव्ह आढळले. पैकी १९ हे शहर हद्दीत तर उर्वरित १९ हे ग्रामीण भागात राहणारे आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. या पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांपैकी कुणीही रुग्णालयात भरती नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिली. शाळेतील विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची कुठलीच माहिती आम्हाला अद्याप मिळाली नसल्याचे शाळेने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *